Search This Blog

Thursday 28 March 2024

सामान्य निवडणूक निरीक्षकांची मिडीया सेंटरला भेट





 सामान्य निवडणूक निरीक्षकांची मिडीया सेंटरला भेट

चंद्रपूर दि. 2: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी जाहिरातींचे प्रमाणीकरण, पेड न्यूज, फेक न्यूज, समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी) स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे कार्य जिल्हा माहिती कार्यालयाच्या मिडीया सेंटर येथून सुरू असून या सेंटरला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., कार्यकारी अभियंता तथा निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी मुकेशकुमार टांगले उपस्थित होते.

यावेळी श्री. जाटव यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि सोशल मिडीयाच्या मॉनेटरिंगबाबत माहिती जाणून घेतली. तसेच सोशल मिडीयावर करण्यात येणा-या पोस्टबाबत अतिशय गांभिर्याने लक्ष ठेवावे, वृत्तपत्रात पेडन्यूज तसेच फेकन्यूज प्रकाशित झाल्यास त्वरीत कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या. प्रमाणीकरणासाठी उमेदवारांचे अर्ज किती दिवसात निकाली काढल्या जातात, याबाबत त्यांनी विचारणा केली. तसेच फाईल्सची पाहणी केली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीचे कार्यपध्दती तसेच मिडीया सेंटर बाबत सामान्य निवडणूक निरीक्षकांना अवगत केले.

००००००

Wednesday 27 March 2024

शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांचे 37 नामनिर्देशन पत्र दाखल

 

शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांचे 37 नामनिर्देशन पत्र दाखल

Ø चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता 36 उमेदवारांचे एकूण 48 अर्ज

चंद्रपूर दि. 213 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरिता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (27 मार्च) 29 उमेदवारांनी 37 नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अर्ज भरणा-या एकूण उमेदवारांची संख्या 36 तर दाखल नामनिर्देशनपत्रांची एकूण संख्या 48 झाली आहे.

बुधवारी (दि.27 मार्च) अर्ज दाखल करणा-यांमध्ये धानोरकर प्रतिभा सुरेश (काँग्रेस) यांनी 3 अर्ज, बेले राजेश वारलुजी (वंचित बहुजन आघाडी) यांनी 3 अर्ज, विद्यासागर कालिदास कासर्लावार यांनी 1 अर्ज भीमसेना पक्षाच्यावतीने तर 1 अर्ज अपक्ष म्हणून, नामदेव माणिकराव शेडमाके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) यांनी 2 अर्ज, जावेद अब्दूल कुरेशी यांनी 1 अर्ज अपनी प्रजा हित पार्टीच्या वतीने तर 1 अर्ज अपक्ष म्हणून, रमेश आनंदराव मडावी यांनी 1 अर्ज बहुजन समाज पार्टीच्यावतीने तर 1 अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे.

याशिवाय पुर्णिमा दिलीप घनमोडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), दिवाकर गुलाब पेंदाम (विरोंके वीर इंडियन पार्टी), मोरेश्वर कोंदुजी बडोले (अपक्ष), मिलिंद प्रल्हाद दहिवले (अपक्ष), सेवकदास कवडूजी बरके (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया, डेमोक्रेटीक), अमोल ओमप्रकाश कोमावार (हिंदू राष्ट्र संघ), राजेंद्र हरिश्चंद्र रामटेके (बहुजन समाज पक्ष), राजेंद्र कृष्णराव हजारे (अपक्ष), दिनेश रामबिशाल मिश्रा (अपक्ष), वनिता राजेंद्र राऊत (अखील भारतीय मानवता पक्ष), जावेद मजिद अब्दुल (अपक्ष), विकास उत्तमराव लसंते (सन्मान राजकीय पक्ष), वाघमारे संदीप विठ्ठल (अपक्ष), देठे प्रमोद देवराव (अपक्ष), संजय नीलकंठ गावंडे (अपक्ष), संजय हरी टेकाम (अपक्ष), राजेश भीमराव घुटके (अपक्ष), शेख ताजुद्दीन वजीर (अपक्ष), सुर्या मोतीराम अडबाले (अपक्ष), अनिल आनंदराव डहाके (अपक्ष), दिवाकर हरीजी उराडे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), दिलीप पुंडलीकराव माकोडे (अपक्ष), गीता अरुण मेहर (अखील भारतीय परिवार पार्टी) यांनी प्रत्येकी 1 अर्ज दाखल केला.

13 चंद्रपूर लोकसभा मतदार संघात मंगळवारी (26 मार्च) 7 उमेदवारांनी 11 अर्ज दाखल केले होते.

०००००

नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध

 नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध

Ø सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

चंद्रपूर दि. 213 चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे सामान्य निवडणूक निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक आणि खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. तिनही निवडणूक निरीक्षक नागरिकांच्या सुचना / तक्रारी ऐकण्यासाठी वन अकादमी येथे उपलब्ध राहणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.  

सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून मध्यप्रदेशचे अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव लोकेशकुमार जाटव (मो.9404912593) हे नागरिकांचे मत, तक्रारी ऐकूण घेण्यासाठी वन अकादमी येथील व्हीव्हीआयपी रेस्ट हाऊस येथे त्यांचे कार्यालय ‘बकूळ’ येथे सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत उपलब्ध राहतील.

कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक म्हणून केरळच्या दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस अधिक्षक सुजीत दास (मो. 9307274907) हे वन अकादमी येथील व्हीव्हीआयपी रेस्ट हाऊस येथील ‘शाल्मिक’ येथे सकाळी 9.30 ते सकाळी 11 पर्यंत उपलब्ध राहणार आहेत.

तर निवडणूक खर्च निरीक्षक हेमंत हिंगोनिया (मो. 9404921146) हे नागरिकांचे मत, तक्रारी ऐकूण घेण्यासाठी ‘बकूल’ व्हीव्हीआयपी कक्ष, कौस्तुभ बिल्डींग, वन अकादमी येथे सकाळी 9.30 ते सकाळी 11 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहेत.

००००००

मतदार फोटो ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य



 मतदार फोटो ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य

चंद्रपूर, दि. 27 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार फोटो ओळख पत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळख पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 करिता ज्या मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (ई-पिक)  देण्यात आलेले आहे ते मतदारमतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाही, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त पुढीलप्रमाणे कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

आधारकार्डमनरेगा जॉब कार्डबँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुककामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्डवाहन चालक परवानापॅन कार्डरजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्डभारतीय पासपोर्टछायाचित्रासह पेन्शन दस्तऐवजकेंद्र/राज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम/ पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जरी केलेले सेवा ओळखपत्रखासदार/आमदारांना जरी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्रभारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे एकुण 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात येणार आहे. छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे किंवा पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रापैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. तर प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी केवळ त्यांचा मुळ पासपोर्ट आवश्यक राहणार आहे.

मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा, मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदानाची तारीख, वेळ इत्यादी माहिती उपलब्ध होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘फोटो व्होटर स्लीप’ ऐवजी ‘मतदार माहिती चिठ्ठी’ मतदानाच्या दिनांकापूर्वी किमान पाच दिवस अगोदर वितरीत करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र मतदारांच्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदार माहिती चिठ्ठी ग्राह्य असणार नाही.   

            चंद्रपूर जिल्हा व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता नियुक्त सर्व संबंधित अधिकारी व सर्व मतदान केंद्राध्यक्षांनी याची नोंद घ्यावीअसे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कळविले आहे.

००००००००

Tuesday 26 March 2024

निवडणूक सामान्य निरीक्षक चंद्रपुरात दाखल

 

निवडणूक सामान्य निरीक्षक चंद्रपुरात दाखल

चंद्रपूर दि. 26 : 13 चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून मध्यप्रदेशचे अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव लोकेशकुमार जाटव हे 26 मार्च रोजी चंद्रपूर येथे दाखल झाले आहेत. त्यांचा मोबाईल क्रमांक 9404912593 असा आहे.

००००००